Holi 2025: मुंबईत प्रत्येकवर्षी होळी आणि रंगपंचमीच्या सणाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, सणाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी यंदा कडक नियमावली जाहीर केली आहे. यासाठी 11,000 हून अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. तसेच, साध्या गणवेशातील पोलिसही शहरभर गस्त घालणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
सणाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या गणवेशातील पोलीस संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. हे आदेश मंगळवार, 18 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असतील. यासाठी 7 अपर पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहायक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदार सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर होमगार्ड, एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्यूआरटी, बीडीडीएस टीम यांचाही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
होळी आणि रंगपंचमी दरम्यान सार्वजनिक ठिकाणी रंग फेकणे, पादचाऱ्यांवर जबरदस्तीने रंग टाकणे, अश्लील शेरेबाजी करणे, अश्लील गाणी वाजवणे, आक्षेपार्ह हावभाव करणे यांसारख्या कृत्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पाण्याने किंवा अन्य द्रव पदार्थांनी भरलेले फुगे फेकल्यास त्यावरही कारवाई होईल. सार्वजनिक ठिकाणी शिस्तभंग करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
सणाच्या काळात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, अनधिकृत मद्यविक्री करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तणूक करणे, अमली पदार्थांचा वापर किंवा विक्री करणे अशा कृत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, गर्दीच्या भागांत विशेष पोलीस गस्त आणि वाहतूक नियमनासाठी फिक्स पॉइंट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.