Bus Accident: कर्जत कुळधरण रस्त्यावर दुरगाव फाटा परिसरामध्ये श्रीगोंदा डेपोच्या (एम. एच. १४ बी.टी १७१० ) क्रमांकाच्या बसचा अपघात झाला. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
कर्जत कुळधरण रस्त्यावर दुरगाव फाटा येथून पुढे जात असणाऱ्या कर्जत श्रीगोंदा गाडीला समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने कट मारला. यावेळी एसटी ड्रायव्हरने तात्काळ एसटी वर नियंत्रण मिळवले. मात्र एसटी रस्त्याच्या खाली घसरली. पलीकडे मोठा खड्डा होता. चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली आहे. एसटीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ही विद्यार्थी घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे.
या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खराब असून त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत. या परिसरातील खराब रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची याकडे दुर्लक्ष आहे. ठेकेदार अतिशय निकृष्ट प्रतीचे काम करीत असून बांधकाम विभागाचे अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का असा प्रश्न नागरिक करत आहे.