spot_img
अहमदनगरआमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

spot_img

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर!
सारीपाट / शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण आता बर्‍यापैकी तापू लागले आहे. नगरमध्ये सुजय विखे यांच्या विरोधात नीलेश लंके यांनी तगडे आव्हान उभे केल्याचे दिसून येत असताना पडद्याआड लंके यांच्यासाठी दिवसाची रात्री करण्यासाठी झगडणारे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून येते. कळमकर- फाळके यांच्या बांधणीतून आणि संपर्कातून नीलेश लंके यांनी मतदारसंघातील गावागावात बांधणी चालवली आहे. कळमकर आणि फाळके हे जसे शरद पवार यांच्या खास गोटातील तसेच या दोघांचीही नीलेश लंके यांच्यावर खप्पा मर्जी! फाळके तात्या सांगतील ती पूर्व दिशा, अशीच काहीशी लंके यांनी भूमिका घेतली असल्याचेही लपून राहिलेले नाही. विधानसभा निवडणुकीआधी म्हणजचे पाच वर्षांपूर्वी लंके समर्थकांनी स्थापन केलेल्या लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा आता संंपूर्ण मतदारसंघात ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाली आहे. मतदारसंघातील कोणत्याही नेत्यापेक्षा प्रतिष्ठानचे स्वतंत्र अस्तित्व हेच लंके यांचे बलस्थान असल्याचे समोर आले आहे.


लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार अर्ज दाखल करण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीतील वातावरण अधिक गरम होणार असले तरी त्याआधी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारसंघातील मोठ्या गावांसह तालुक्याच्या ठिकाणी बैठका आणि त्यामाध्यमातून प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी  घेतानाच रुसवे- फुगवे काढणे आणि बेरजेचे राजकारण करणे यावर नीलेश लंके आणि सुजय विखे या दोघांनीही भर दिल्याचे दिसून आले. जोडीने या दोघांकडूनही जेवणावळीही झडत आहेत. वाढदिवस- यात्रा यासह अन्य सोयीस्कर कारण देऊन कार्यकर्त्यांना एकत्र करणे आणि भूमिका समजावून सांगत प्रमुख कार्यकर्ते चार्ज करण्यावर दोघांचाही भर असल्याचे दिसते. या दोघांशिवाय अन्य राजकीय पक्षांचे प्रमुख उमेदवार अद्यापतरी समोर आलेेले नाहीत. मात्र, ही लढत दुरुंगी होणार नाही हेही तितकेच खरे!

सुजय विखे यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर होत नव्हता. नीलेश लंके की राणीताई लंके याचा निर्णय बरेच दिवस होत नव्हता. कार्यकर्त्यांसह लंके समर्थकांना स्वत: नीलेश लंके यांची उमेदवारी हवी होती तर स्वत: लंके हे राणाताई लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यातून आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार नाही आणि आमदारकी हे शस्त्र हातात राहील असा त्यांचा अंदाज असावा. मात्र, शरद पवार हे स्वत: नीलेश लंके यांच्यासाठी आग्रही राहिले आणि त्यातूनच पुढे नीलेश लंके हेच उमेदवार म्हणून पुढे आले.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लंके यांनी दुसर्‍याच दिवशी थेट तुळजापुर गाठले आणि तिसर्‍या दिवशी मोहटादेवी गडावरून संवाद यात्रेस प्रारंभ केला. ही यात्रा आता मतदारसंघातील बहुतांश प्रमुख गावांमधून नगर शहरात दाखल होत आहे. स्वत:च्या पारनेर या होमग्राऊंडवर एक लाखांचे मताधिक्य त्यांनी व त्यांच्या यंत्रणेने अपेक्षित धरले आहे. विधानसभा निवडणुकीत जवळपास पासष्ट हजारांचे मताधिक्य त्यांना होते. आता हेच मताधिक्य एक लाखांपेक्षा जास्त मिळणार असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. नगर शहरात संवाद यात्रा येणार असून येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते यानिमित्ताने शहरात दाखल होतील. याशिवाय विखे यांच्या विरोधकांनाही या व्यासपीठावर आणले जाऊ शकते. यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करतानाच विखे यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान निर्माण केल्याचा मेसेजही लंके व त्यांचे समर्थक देणार यात शंकाच नाही.
पारनरेमध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात नीलेश लंके हे यशस्वी ठरले.

त्याची चुणूक अनेकदा आली. पाच वर्षांपूर्वीचे हे प्रतिष्ठान पुढे राज्यपातळीवर काम करू लागले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजधानी दिल्लीतही या प्रतिष्ठानच्या शाखा आणि कार्यकर्त्यांचे जाळे आहे. आता नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याआधी पासूनच लंके यांनी या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात आणि मोठ्या गावांमध्ये प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांची मोट बांधली आहेच. नगर दक्षिणेतील प्रतिष्ठानच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून लंके यांनी गावागावात संपर्क अभियान राबविले. याशिवाय गावागावात तरुणांचे नेटवर्क उभे करताना त्यांच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांमध्ये असणारी परंतू आपल्याला व्यक्तीश: मानत असणारी तरुणांची फळी उभी केली. मतदारसंघातील कोणत्याही मोठ्या नेत्याला अथवा त्याच्या यंत्रणेला समांतर अशी ही यंत्रणाच लंके यांचे बलस्थान ठरणार आहे. नेते मंडळी मॅनेज झाले तरी ही फळी आपली राहील आणि तीच आपलं सर्वस्व असणार हे नीलेश लंके यांनी हेरले आहे. त्यामुळेच नेतेमंडळींकडून दगाफटका झाली तरी प्रतिष्ठान दगाफटका करू शकणार नाही याची खात्री पटल्यानेच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम नीलेश लंके यांच्या माध्यमातून आतापासूनच सुरू झाले आहे. अपंगांसाठी काम करत असताना बच्चू कडू यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर नीलेश लंके हे देखील संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न राहता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत आणि त्यात त्यांना यश येत असल्याने तीच त्यांची पहिल्या टप्प्यात जमेची बाजू ठरली आहे.

युवकांचे मोठे संघटन आणि त्याद्वारे निर्माण झालेली प्रतिमा जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेंद्र फाळके यांनी हेरली. त्यातूनच त्यांनी नीलेश लंके यांचे नाव शरद पवार यांच्यासमोर लोकसभेचा उमेदवार म्हणून ठेवले. सोबतीला माजी आमदार दादाभाऊ कळमकर होतेच! कळमकर आणि फाळके हे दोघेही शरद पवार यांचे जिल्ह्यातील डावे- उजवे! कर्जत- जामखेडमध्ये रोहीत पवार यांच्याशी फाळके यांचे फारसे सख्य नसल्याचे सर्वश्रूत! त्यातच लंके हे कर्जत- जामखेडमध्ये भाजपाचे राम शिंदे यांच्याशी जोडले गेलेले. रोहीत पवार हे त्यातून दुखावले असताना फाळके यांनी राम शिंदे यांच्याशी लंके यांचे सूत जुळवून देण्यात मोठे परिश्रम घेतले. लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम शिंदे यांचे समर्थक नीलेश लंके यांच्या प्रचारात सक्रिय करण्यात फाळके यांचा मोठा वाटा राहिला आहे.

कर्जत- जामखेडमधून लंके यांना मताधिक्य देण्यात रोहीत पवार यांच्यापेक्षा राम शिंदे यांची कशी मदत होत आहे याची बित्तमबात बारामतीला पोहोच करण्याचे काम फाळके तात्या करत आहेत. त्यातून रोहीत पवार यांचे काय होईल याहीपेक्षा नीलेश लंके हे लोकसभेत मोठ्या मताधिक्याने कसे निवडून जातील यासाठी फाळके यांचा अटापीटा चालू असल्याचे दिसते. दुसरीकडे पस्तीस वर्षांपूर्वी नगर शहरात आमदार राहिलेल्या दादाभाऊ कळमकर यांनीही लंके यांच्यासाठी कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वी दादांचे पुतणे अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेसाठी त्यांचे करण्यात आलेले लाँचिंग बरेच काही सांगून जात आहे. एकूणच पहिल्या टप्प्यात नीलेश लंके यांनी गाठीभेठी आणि बैठकांच्या जोरावर पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजला आहे. संवाद यात्रेच्या नगर शहरातील समारोपानंतर लंके व त्यांची यंत्रणा अधिक गतीमान झाल्याचे दिसणार यात शंका नाही.

बाळासाहेब थोरातांनाही घालावी लागली मुरड
तरीही लंके यांच्यासाठी अ‍ॅक्टीव्ह केली यंत्रणा!
मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असल्याने पवार हेच येथील उमेदवार ठरवणार होते. पहिल्यादिवसापासून येथे लंके हेच उमेदवार असणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, लंके यांच्याकडून निर्णय होत नव्हता. भाजपाकडून सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही लंके यांचा निर्णय होत नसल्याचे पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वत: येथून लढण्याची तयारी सुरू केली होती. थोरात यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नगरमधून विखे- थोरात हा पारंपारीक संघर्ष होणार अशी चर्चा झडू लागली. नगरमधून आपण लढण्यास तयार असल्याची इच्छा त्यांनी शरद पवार यांना भेटून व्यक्त केली. मात्र, आपल्या या मतदारसंघातील काँग्रेसकडील उमेदवारीची घोषणा शरद पवार यांनी करावी अशी अट थोरात यांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवली. यानंतर शरद पवार यांच्याकडून सुत्रे हलली. नीलेश लंके यांना सांगावा धाडला गेला आणि त्यानंतर लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची आणि लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. लंके यांनी उमेदवारी केली नसती तर बाळासाहेब थोरात हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असते. त्यादृष्टीने थोरात यांनी तयारीही चालवली होती. त्यातून विखे विरुद्ध थोरात ही लक्षवेधी लढाई झाली असती. मात्र, असे असले तरी आता त्याच थोरात यांनी लंके यांच्यासाठी स्वत:ची यंत्रणा नगरमध्ये अ‍ॅक्टीव्ह केली असल्याचे दिसून येते. थोरात यांच्या यंत्रणेतील प्रमुख सध्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....