पारनेर | नगर सह्याद्री
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संपूर्ण राज्यात वातावरण तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आरक्षण मागणीची धार तीव्र होत चालली आहे. जिल्हातील पारनेर तालुक्यातील गावांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुठे गाव बंद तर कुठे रास्तारोको, पुढार्यांना गाव बंदी तर मोठे कँडल मार्च दरम्यान आमदार लंके यांनी आदोलकांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्याबाबत सूचना दिल्या आहे.
मराठा आरक्षणासाठी हंगात रास्ता रोको
तालुक्यातील हंगा येथे बुधवार दि १ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनानुसार हंगा-मुंगशी गावच्या वतीने गाव बंद अंदोलन व हंगा-पारनेर रस्तावररस्तारोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी संतप्त तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवले परंतू आमदार निलेश लंके यांनी मुंबईवरून फोनद्वारे संपर्क करून शांततामय मार्गाने आंदोलन करण्याबाबत सूचना दिल्या त्यानंतर हाडको बस स्टॉपपासून मोर्चा काढण्यात आला होता.
पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा
मंगळवार दिनांक ३१ ऑटोबर २०२३ रोजी सकल मराठाआरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लोणी हवेली, पोखरी, म्हसोबा झाप, वारणवाडी ता. पारनेर येथील तरुण, महिला, अबालवृद्ध सरसावले असून जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार गावकर्यांनी घेतला आहे. यावेळी विविध गावच्या ग्रामस्थांसह महिलांनी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना या संबंधीची लेखी निवेदन दिले. पारनेर शहरासह टाकळी ढोकेश्वर, पोखरी परिसरातील गावांनी कडकडीत बंद ठेवण्यात आला. लोणी हवेली येथील महिला व ग्रामस्थांनी पाच किलोमीटर अंतर पायी चालत येऊन टाळ, मृदुंगाच्या सुरात अभंग म्हणत तहसीलदारांना पाठिंब्याचे निवेदन दिले. तर पोखरी परिसरातील युवकांनी जवळपास १५० ते २०० गाड्यांची रॅली काढून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रचंड घोषणा सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.
मराठा आरक्षणासाठी भाळवणीत रास्ता रोको
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी पारनेर तालुयातील विविध गावांमध्ये आंदोलनास सुरवात करण्यात आली असून भाळवणीत मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाळवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नागरिकांनी नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसिलदार गायत्री सौदांने, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आंदोलकांशी समन्वय साधत निवेदन स्विकारले. यावेळी संदीप रोहकले, बबलु रोहकले, अरूण रोहकले, संतोष गुंजाळ, संदीप ठुबे, मारूती रोहकले, प्रणव रोहकले, तुषार रोहकले, संजय काळे, अमोल पवार, भागुजी रोहकले, लहानु रोहकले, संतोष रोहकले व मोठ्या संख्येत परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भोयरे गांगर्डा सोसायटीच्या संचालकांचे राजीनामे
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. मंगळवार दि.३१ रोजी भोयरे गांगर्डात सेवा सोसायटीच्या संचालक दादासाहेब रसाळ, विजय कामठे, प्रदिप भोगाडे, संजय पवार, माणिक पवार या विद्यमान संचालकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.
निलेश लंके यांच्यासह मराठा आमदारांनी लावले मंत्रालयाला टाळे
मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे व या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावे या मागणीसाठी बुधवारी सकाळी निलेश लंके यांच्यासह इतर मराठा आमदारांनी थेट मंत्रालयाला टाळे ठोकले आहे. एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन बोलवावे आरक्षण आमच्या हक्काचं..अशा विविध घोषणांनी मंत्रालय परीक्षा अक्षरशः दुमदुमून गेला होता. अर्ध्या तासानंतर आमदार निलेश लंके यांच्यासह इतर १५ ते २० मराठा आंदोलनकर्त्या आमदारांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन सोडून देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.