सुपा | नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील जनतेला नेमकं काय हवं आहे आणि अधिकारी काय करतात..? पारनेर तालुक्याला बदनाम करण्याचं षडयंत्र तर नाही ना..? असा सवाल मनसेचे नेते अविनाश पवार यांनी उपस्थित केला असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पारनेर साठी निष्कलंक तहसिलदारांची नेमणूक करावी अशी मागणी पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पारनेर तालुका हा सेनापती बापट, जेष्ठ समाज सेवक अण्णा साहेब हजारे यांच्या नावाने ओळखला जातो. या तालुक्यातील समाजसेवकांनी राज्याला नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात अशा पध्दतीने प्रशासकीय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने काम करणे दुर्दैवी आहे. यांची जिल्हा अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी व दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन पारनेर तालुक्यात निष्कलंक अधिकारी द्यावा.
पारनेर तालुक्यातील गोरगरीब कुटुंब रेशन कार्ड च्या आधारे रेशनिंग धान्यापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर जिल्हा अधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा जनतेला वेठीस धरून लोकप्रतिनिधींची जाहिरात करण्यासाठी मलिदा गोळा करणार्या अधिकारी यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल व त्याला हेच भ्रष्ट अधिकारी जबाबदार राहतील असेही मनसेचे माथाडी कामगार सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.