मुंबई। नगर सहयाद्री
Covid-19: कोरोनाच्या जेएन १ या उपप्रकाराचा रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोरोना प्रतिबंध करणारे वर्तन करणे गरजेचे असल्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
दरम्यान, केरळमध्ये कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून जवळपास २०० रूग्ण आढळले आहेत.या नवीन उपप्रकाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सरकारने सर्व जिल्ह्यांना दक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इन्फ्लूएन्झा आजारासह सारी तसेच श्वसन विकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे, आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे.
ठाण्यात ओमायक्रॉन जेएन-वन या नवीन स्वरूपाचा पहिला रुग्ण मंगळवारी आढळला. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुपारी ४.३० वाजता एका १९ वर्षीय तरुणीस या संसर्गावरील उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ही तरुणी मुंब्रा परिसरात वास्तव्यास आहे. जेएन-वन हा ओमायक्रॉनचा नवीन प्रकार केरळमध्ये आढळल्यानंतर ठाण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाने खबरदारीसाठी तपासणी केली. यात गेल्या आठवडाभरात तीनशेहून अधिक जणांची तपासणी झाली होती.
मंगळवारी १९ वर्षीय तरुणीची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. यामुळे आता ठाण्यात तपासणीवर आणखी भर दिला जाण्याची शयता आहे. राज्यात आरोग्य संस्थेचे मॉकड्रील १७ डिसेंबरला करण्यात आले.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रुग्णालयीन पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील १५ ते १७ डिसेंबरदरम्यान केले आहे. राज्यातील सर्व जिल्हे, पालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदवला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑसिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, टेलीमेडिसीन सुविधा यांचा आढावा घेण्यात आला.