जामखेड/ नगर सह्याद्री
मोहा (ता. जामखेड) येथील रेणुका कलाकेंद्रावर चार जणांच्या टोळक्याने हत्यारांसह धुडगूस घालून थिएटर मालकाकडे दरमहा एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात अश्लील वर्तन, विनयभंग, खंडणी व आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रेणुका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तक्रार दिली आहे की, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास शुभम लोखंडे, सतीश टकले, नागेश रेडेकर (रा. आष्टी, जि. बीड) व अक्षय मोरे उर्फ चिंग्या (रा. जामखेड) हे चौघे जण हातात कोयते घेऊन थिएटरमध्ये आले.
त्यांनी थिएटर मालक अनिल पवार व त्यांचे पुत्र परशु व मोहित यांना दरमहा एक लाख रुपये खंडणी देण्याचा दबाव टाकला. तसेच, कोयत्याच्या धाकावर थिएटरमधील खुर्च्या, टेबल, व नृत्यांगनेची दुचाकी (स्कूटी) यांची तोडफोड केली. नृत्य करीत असलेल्या महिलांची छेडछाड करत अश्लील वर्तन देखील करण्यात आले. ज्योती जाधव यांनी हस्तक्षेप करताच त्यांच्यावरही हल्ला झाला असून, शुभम लोखंडे याने त्यांचा ब्लाऊज फाडत धक्का दिल्याचा आरोप आहे.
तसेच यापूर्वी देखील आरोपींनी नवरात्रोत्सवासाठी लावलेले बॅनर फाडून, बीड रोडवरील हॉटेलमध्ये तोडफोड केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वारंवार दमदाटी करणे, पैसे न देणे आणि धमकावणे असे प्रकार घडत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणात दुसरी फिर्याद शुभम लोखंडे यांनी दाखल केली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार परशु पवार व त्याच्या साथीदारांनी तपनेश्वर गल्ली येथे गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून वाद घालून त्यांना नटराज कलाकेंद्रात बोलावून घेत शिवीगाळ केली. यानंतर कत्ती (कुकरी), दगड, लोखंडी चैन व चॅनलने मारहाण करुन त्यांना व त्यांच्या मित्राला गंभीर जखमी करण्यात आले.
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून जामखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करत आहेत.