अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विशेष सहाय्य कार्यक्रमार्तंगत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डिसेंबर 2024 पासून डीबीडीद्वारे सुरु झाले आहे. जानेवारी महिन्याचे थेट अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. ज्यांचे बँक खाते आधार व मोबाईल नंबरशी संलग्न नाही, अशा लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारीपासून बंद होणार आहे.
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील वयोवृद्ध, आजारी, दिव्यांग व विधवा महिलांना मिळणारे अर्थसहाय्य तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते. लाभार्थ्यांना अर्थसहायाचे वितरण जलदगतीने करणे व नागरिकांना मिळणार्या सेवा जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने योजनांचा लाभ डीबीटी पोर्टल द्वारे करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे थेट अनुदान वाटपास सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथून पुढे सर्व लाभार्थ्यांची उघडण्यात आलेली बँक खाती आधार व मोबाईल नंबरशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांचे बँक खाते संलग्न नाही अशा लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2025 पासून लाभ बंद होणार आहे.
विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी या योजनेसाठी उघडण्यात आलेले बँक खाती आधार व मोबाईल नंबर जोडण्यासाठी तहसील कार्यालय येथे आपले आधार, मोबाईल क्रमांक व बँक खाते तात्काळ जमा करावे
सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी