मुंबई / नगर सह्याद्री : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. शरद पवारांनी स्थापना केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित दादांच्या हातात गेला आहे.
निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजित पवार यांच्या गटाला मान्यता दिलेली आहे. साधारण वर्षभरापूर्वी आमदारांचा मोठा गट अजित पवारांसोबत सत्तेत गेला परंतु शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहणे पसंत केले. परंतु आता विधिमंडळातील संख्याबळ पाहता निवडणूक आयोगाने या पक्षासह चिन्हावर अजित पवारांचा हक्क सांगितला आहे.
शरद पवार गटाला नवीन नाव व नवीन चिन्ह
आता शरद पवार गटाला नवीन चिन्ह व पक्ष लागेल. निवडणूक आयोगाने त्यांना आज (बुधवार) दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलेल असून त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. त्यामुळे आता हे नवीन नाव काय असू शकते,चिन्ह काय असू शकते यावर सध्या चर्चा सुरु आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ हे नाव आता त्यांच्या नव्या पक्षाच असेल व ‘उगवता सूर्य’ या चिन्हासाठी पवार गट अर्ज करु शकतो अशी माहिती मिळालेली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार’ यात मोठ्या साहेबांचे नाव असल्याने फायदा होईल असे गणित यामागे असू शकते.