पुणे । नगर सहयाद्री:-
सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा व गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत 11 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, फसवणुकीचा आकडा 9 कोटी 49 लाख 35 हजारांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत राहुल रामराजे मक्तेदार (वय 43, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीणकुमार बन्सीलाल नाहाटा (रा. ईशान्य सोसायटी, शंकर महाराज मठाजवळ, पुणे-सातारा रोड), अजय श्यामकांत चौधरी (रा. गजनिया गार्डन, भांडारकर रोड), रविराज गजानन जोशी (रा. सिंहगड रोड) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौधरी, जोशी यांना अटक केली असून नाहटा फरार आहे.
फिर्यादी राहुल मक्तेदार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या पत्नीची सॉफ्टेज मॉड्युलर फर्निचर ही कंपनी आहे.
त्यांना अजय चौधरी यांच्या भांडारकर रोडवरील फ्लॅट, ऑफिसचे व टेरेसचे फर्निचर व खिडक्यांचे काम करत असताना ओळख झाली. त्यावेळी त्यांनी नाहाटा यांची ओळख करून दिली. दरम्यान, महाराष्ट्र शासनाची मॅग्नेट (महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) ही योजना आहे. त्यामध्ये एक कृषी उत्पादक कंपनी काढली जाईल, त्याचे तुम्हाला संचालक बनवू. त्यामध्ये तुम्ही 20 लाख रुपये गुंतविल्यास 78 दिवसांनंतर शासनाच्या योजनेप्रमाणे 60 लाख रुपये परतावा मिळेल. त्यातील ते’ स्वतःसाठी 25 लाख, 5 लाख अजय चौधरी यांना मध्यस्थी म्हणून कमिशन आणि 30 लाख रुपये तुम्हाला परतावा मिळेल, परतावा देऊन तुमचा राजीनामा स्वीकारला जाईल असे आरोपीकडून सांगण्यात आले.
मी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचा सभापती आहे, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा असे नाहटा यांनी सांगितले. ही सरकारी योजना आहे. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने दागिने मोडून आरोपींच्या योजनेमध्ये पैसे गुंतविले आहेत. दरम्यान, त्याचवेळी अजय चौधरी याने आम्ही, पाचगणी येथील दांडेघर गावातील जमीन (हॅरिसन फॉली) येथील जमीन विकसित करायची असून, त्या व्यवसायाकरिता 1 कोटी 60 लाख रुपये हात उसने पैशांची मागणी केली. त्यांनी एक महिन्यांमध्ये परत करतो, या बोलीवर त्यांच्याकडून 1 कोटी 60 लाख रुपये घेतले.
गेल्या वष 27 नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी हे पैसे दिले होते. अजय चौधरी याने दिलेले धनादेश बँकेत भरले असता ते वटविण्यात येऊ नये, असे अजय चौधरी याने बँकेला कळविले होते. दोघांनी दोन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादीने तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिषा निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.