अहमदनगर । नगर सहयाद्री-
नगरच्या श्रीरामपूर शहरातील एका महिलेने मुंबईच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरण संपत शिंदे (वय ३४ रा. कुलाबा, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा दगडू पाठक उर्फ मंदा अण्णासाहेब जेवरे (सध्या रा. फ्लट नंबर १६, राधेय अपार्टमेंट, कांदा मार्केट रस्ता, श्रीरामपूर) असे महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त: किरण शिंदे यांनी नगरमधील एका मध्यस्थी मार्फत पुणे जिल्ह्यात शेत जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान त्यांची महिलेसोबत सोबत ओळख झाली. त्यावेळी तिने तिचे नाव कुसुम रामराव कुमदाळे असल्याचे खोटे सांगितले. त्या नावाची बनावट कागदपत्रे दाखवत विश्वास संपादन करत वडिल किसन कुमदाळे यांचा मृत्यू दाखला दाखवून त्यावरून ती कुसुम रामराब कुमदाळे असल्याचे भासविले.
हवेली येथे गट नंबर ४२७/२ वर० हेक्टर ४५ आर शेत जमिनीची मालक असल्याचे सांगितले. सदरची शेत जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारापोटी ३ मे २०२३ रोजी शिंदे यांच्याकडून नोटरी पब्लिक श्रीमती एस. एस. नगरकर, गुलमोहोर रस्ता, सावेडी येथे सदर शेत जमिनीची नोटरी करून घेतली व त्यांच्याकडून ३० हजार रुपये रोख व चार लाख ७० हजारांचा चेक घेतला.
दरम्यान शिंदे यांनी तिला फोन करून जमिनीबाबत विचारणा केली असता तीने टाळाटाळ केली. शिंदे यांनी चौकशी केली असता ती कुसूम रामराव कुमदाळे नसून मंदा अण्णासाहेब जेवरे असल्याचे स्पष्ट झाले. तिचा हवेली येथील शेत जमिनीशी कोणताही संबंध व मालकी हक्क नसल्याचे समजले. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.