अहमदनगर | नगर सह्याद्री
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव नगर शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त अवघे नगर शिवमय झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातून जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणारी मिरवणूक नगरकरांचे आकर्षण ठरली. शिवजयंती निमित्त आ. संग्राम जगताप यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, बाळासाहेब पवार, निखिल वारे, प्रा. सीताराम काकडे, ज्ञानेश्वर काळे, सागर गुंजाळ, संपत नलावडे, जयंत वाघ, संजीव भोर, विवेक नाईक, गीतांजली काळे. पल्लवी जाधव आदींसह विद्यार्थी, नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत पारंपरिक कला, नृत्य सादर केले. तसेच विविध विषयांवरील समाज प्रबोधनाचे देखावे सादर करण्यात आले होते. यावेळी युवा पिढीने शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
उपनेते माजी आमदार अनिल राठोड मित्र मंडळाच्या वतीने परंपरेप्रमाणे जिल्हा मराठा संस्थेच्या वतीने काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच लेझीम खेळून आनंद व्यक्त केला. मिरवणुकीमध्ये युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य असा सिंहासनावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यूत रोषणाई करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. या पुतळ्याच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचेल, तसेचछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असा कारभार महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजि. श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, इंजि. महादेव काकडे, इंजि. रोहोकले, इंजि. शिंदे, बंडू इवळे आदी उपस्थित होते.शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विविध सामाजिक, राजकीय संघटना, शिवप्रेमी, पक्षाचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले.