पुणे / नगर सह्याद्री : खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये व पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळला. मृतदेह नवीन खडकी ब्रीजच्या खाली मुळा नदीच्या पात्रातील जलपर्णी मध्ये आढळून आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एकाचा मृतदेह सापडला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी तो जाळण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवला. दरम्यान, पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे. या तरुणाचा खून कोणी व कोणत्या कारणामुळे केला याचा तपास खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहेत.
जुनी भांडणे व दारू पिताना झालेला वाद, तसेच अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे चाैकशीत उघडकीस आले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आराेपीला अटक केली आहे. एक चिठ्ठी व मयताचे अंगावरील कपड्यांच्या तुकड्यावरुन खडकी पाेलिसांनी गुन्ह्याची उकल केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त विजय मगर यांनी दिली.