अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले असून नाहाटा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर अजित पवार गटाकडून पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पारनेरचे माजी सभापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीवर करण्यात आली आहे.
गायकवाड यांच्या जागी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी काढले असून हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. नियुक्ती पत्र देताना आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कपिल पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नाहाटा यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.