अहमदनगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेची १३४ पदांची कर्मचारी भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पगार खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या आवश्यक असलेली पदे भरण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्यामुळे यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत सुरू झालेली प्रक्रियाही थांबली आहे.
आस्थापनेवरील मंजूर असलेल्या महापालिकेतील २८७१ पदांपैकी दीड हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचार्यांची कमतरता असल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी भरती बाबत प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने महानगरपालिकेतील रिक्त पदांपैकी १७५ पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यातील १३४ तांत्रिक पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
याबाबतची सर्व माहिती महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सीला देण्यात आलेली आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेअंतर्गत होणार्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असावा, याची सविस्तर माहितीही महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही सुरू झाले. मात्र, आता १३४ पैकी जी पदे तातडीने भरण्याची गरज आहे, तेवढीच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिली प्रक्रिया ठप्प झाली असून पुढील आठवड्यात भरती प्रक्रियेबाबत निर्णय होणार आहे.