अहमदनगर। नगर सहयाद्री
नागरिकांकडून पाणीपट्टीची सुरळीत वसुली करता यावी, यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीची बिले स्वतंत्र करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी सर्वसाधारण सभेत दिले. नागरिकांना आता पाणीपट्टीचे दर तीन महिन्याचे बिल दिले जाणार आहे. तसेच, कचरा संकलन सेवा शुल्क व इतर दरवाढीचे प्रस्ताव मंजूर केले असून, आता हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.
गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कचरा संकलन सेवा शुल्क, अग्निशमन सेवा शुल्क, सावेडी जॉगिंग ट्रॅकचे भाडे, रेकॉर्ड विभागातील नक्कल फी, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील दंडात्मक कर व इतर सेवा शुल्कामध्ये वाढ प्रस्तावित केली होती. त्याला शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, घरपट्टी व पाणीपट्टीची बिले स्वतंत्र करण्याचे आदेश देण्यात आले.
सध्या मालमत्ता व इतर करांसह पाणीपट्टीचे एकत्रित वार्षिक बिल दिले जाते. पुढील वर्षीपासून दर तीन महिन्यांनी पाण्याचे बिल दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही पाणीपट्टी भरणे सुलभ होईल व मनपालाही विजेची बिले भरण्यासाठी नियमित निधी उपलब्ध होईल, असे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.