केडगाव येथील मदत केंद्राचा जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर । नगर सहयाद्री
जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेतंर्गत महापालिकेच्या माध्यमातून केडगाव रेणुकामाता मंदिर परिसर येथे कार्यान्वीत करण्यात आलेल्या मदत केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले. महापालिका आयुक्त यशवंत डांगे हे देखील शहरात सर्वाधिक लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश होण्यासाठी मनपाने शहरात सुरु केलेल्या 16 केंद्रावर लक्ष ठेऊन आहेत. केडगावमध्ये विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी 228 महिला लाभार्थींची नोंदणी करण्यात आली.
या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. सौरभ जोशी, स्थायीचे माजी सभापती मनोज कोतकर, प्रभाग अधिकारी अशोक साबळे, केडगाव प्रभाग अधिकारी नाना गोसावी, सुखदेव गुंड, प्रसिध्दी प्रमुख शशिकांत नजन, क्रीडा अधिकारी व्हिन्सेंट फिलिप्स, सुप्रिया घोगरे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांचा समावेश होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असून, मात्र 15 जुलै पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याचा उद्दीष्ट आहे. यासाठी लाभार्थी महिलांना एकत्रित करुन त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी ॲप देखील उपलब्ध करुन देण्यात आला असून, जे सुशिक्षित आहे, त्यांनी या ॲपद्वारे नाव नोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून शहरात 16 ठिकाणी मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरात प्रत्येक भागात जाऊन हे कॅम्प आयोजित केले जात आहे. ऑफलाईन अर्ज घेऊन ते नावे ऑनलाईन पद्धतीने समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. शहरातील जास्तीत जास्त महिला लाभार्थींचा या योजनेत समावेश व्हावा, हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी मदत केंद्रावर येऊ न शकणाऱ्या महिलांसाठी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेणार आहेत. या योजनेसाठी सोप्या पध्दतीने ॲप जारी करण्यात आले असून, मोबाईलच्या माध्यमातून देखील अर्ज भरता येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह रेणुकामाता मंदिरात दर्शन घेतले. केडगावच्या मदत केंद्रावर नाव नोंदणीसाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ व आयुक्त डांगे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. तर मोबाईलद्वारे देखील काही महिलांचे अर्ज भरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. मनपाने माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात सुरु केलेल्या मदत केंद्रामुळे महिलांची धावपळ व होणारी लूट थांबली असून, महिला वर्ग या मदत केंद्राच्या माध्यमातून आपली नावे नोंदवत आहे.