संगमनेर । नगर सहयाद्री :-
संगमनेरात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनाधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी करावे तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उध्वस्त करावे असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर शहरातील शासकीय विश्राम गृहावर संगमनेर शहर, तालुका घारगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी बाबतचा आढावा घेण्यासाठी आ.अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस संगमनेर उप विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस स्थानक मध्ये आलेल्या तक्रारदार यांच्या बरोबर कर्मचारी यांचे वर्तन सभ्यपणाचे असावे, उद्धटपने वागू नये अशा सूचना ही दिल्या आहेत.
आ. खताळ म्हणाले, मागील काही दिवसापूव शहरात सुरू असणारे सर्व अनाधिकृत कत्तलखाने उध्वस्त केले होते. पोलिसांनी मागील आठवड्यात तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यावर कारवाया केल्या आहेत यापुढे अशा ठिकाणी निदर्शनास आल्यावर ज्या हद्दीत असतील तेथील प्रशासनाने, नगर पालिका प्रशासनाने नोटीसा देऊन शहरात सुरू असणारे अनधिकृत कत्तल खाने उध्वस्त करण्यात यावे असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.