अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्यापावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम अजून वाढणार आहे. 10 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), संभाजीनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसाठी हवामान विभागाने चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 11 मे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 12 मे-संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काजव्यांचे आगमन
भंडारदरा पाणलोटातील पांजरे, उडदावणेसह अन्य भागात तुरळक प्रमाणात काजव्यांचे आगमन झाले आहे. दरम्यान, काजव्यांचे आगमन होत असल्याने यंदा पाणलोटात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा कयास आदिवासी बांधवांचा आहे. भंडारदरा पाणलोटातील पांजरे, उडदावणे, तसेच अन्य भागात तुरळक प्रमाणात लुकलुकणारे काजवे तुरळक प्रमाणात दिसू लागले असून यापुढे दिवसागणिक याच काजव्यांचे प्रमाण वाढणार असून निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या भागाकडे वळणार आहेत.
भंडारदरा परिसरात मुसळधारा
भंडारदरा धरण आणि परिसरात शुक्रवारी ढगांची गद होऊ लागली होती. रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटात पावसास सुरूवात झाली. सुरूवातीला रिपरिप सुरू होती. त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. त्यानंतर रात्री 9.30 वाजताही रिपरिप सुरू होती. पाणलोटातील काही भागातही पाऊस कोसळत होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.