spot_img
ब्रेकिंगसामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

spot_img

अहिल्यानगर- 
अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि श्रीमंत असा भेद न करता सर्वांनाच सारखाच न्याय देणारा, स्वाभिमानाने जगत कोणापुढे मान न तुकविणारा, वाहनांचा छंद जोपासणारा, स्वत:चे एक वलय तयार करून मस्तीत जगणारा असा नेता अहिल्यानगरमध्ये पुन्हा होणे नाही.

अरुणकाकांचे मूळ गाव बनपिंप्री. त्यांचे वडील बलभीम जगताप हे वारकरी संप्रदायाचे पाईक. दूध व्यवसायानिमित्त ते नगर येथे स्थायिक झाले व लकी हॉटेल चालू केले. काकांचा जन्म नगरचाच. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी पाचवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. त्यांना व्यायामाचा छंद लागला. तालमीत जाणे व व्यायाम करणे, परिसरातेील हगामे करणे, लकी हॉटेलमध्ये बसणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यातूनच त्यांचा लोकसंग्रह सुरू झाला. त्या काळापासून काका मित्रमंडळी जमवीत गेले.

नगर शहरात लोकसंघटन करीत असतानाच माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी काकांंवर शहर काँग्रेसची जबाबदारी सोपविली आणि त्यातूनच त्यांचा राजकारण प्रवेश झाला. दिलेली जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. त्यांनी दोन वेळा नगर शहरातून आमदारकीची निवडणूक लढविली पण त्यात त्यांना यश आले नाही. पण तरी ते निराश झाले नाहीत. पुढे नगरसेवक पदाची निवडणूक लढविली व ते निवडून आले. 1992 ते 1997 ते फक्त मूळ पाच नगरसेवकांच्या जीवावर अन्य नगरसेवक मिळवून नगराध्यक्ष झाले. मी पण त्यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यांची व माझी मैत्री तेव्हापासून अखेरपर्यंत टिकली.

अरुणकाकांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या योजनेतून गंगा उद्यान, लक्ष्मी उद्यान, प्रोफेसर कॉलनी चौकातील अग्निशामक केंद्र, पथदिव्यांसह गुलमोहर रोडची निर्मिती, जुन्या पालिकेसमोर संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल अशी ठळक व मुख्य कामे झाली आहेत. राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या उभारणीच्या काळात एक लाख रुपये देऊन अतिक्रमण जागेचा प्रश्न सोडविला. तसेच माजी खासदार शंकरराव काळे यांना पालिकेतर्फे मानपत्र दिले.

अरुणकाका नगराध्यक्ष असतानाच गुणे आयुर्वेद कॉलेज बंद पडण्याच्या स्थितीत आले होते. तेव्हा अरुणकाकांनी आपल्या हाती त्याची सूत्रे घेऊन कॉलेज तर वाचविलेच. शिवाय भव्य इमारती बांधून व वेगवेगळे प्रकल्प राबवून या कॉलेजला वैभवशाली शिखरावर नेऊन ठेवले आहे. सुवालाल गुंदेचा यांनी काकांना जिल्हा क्रिकेट असोसिएशने अध्यक्ष केले. त्यांना ही संधी मिळाल्यामुळे पुढे स्टेडियम तर झालेच; परंतु आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी कोट्यवधींचा निधी आणून मोठे काम सुरू केले आहे.

अरुणकाका दोन वेळा विधानपरिषदेचे सदस्य झाले. ते संसदीय राजकारणात फार रमले नाहीत. लोकांमध्येच काम करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, अडचणीत आल्यावर व्यक्तिगत पातळीवर मदत करणे, मग ती आरोग्यसेवा असेल किंवा अन्य सेवा ते करीत राहिले. त्यांनी नगर दंगलमुक्त करण्यास मदत केली. विरोधकांनाही जवळ घेऊन त्यांचा सन्मान केला. कायम शत्रुत्व ठेवले नाही. त्यामुळे नगरची सर्वपक्षीय जनता त्यांना मानत होती. याबाबतची घटना मी नमूद करतो. राज्यस्तरावर एक घटना घडली होती. त्याचे पडसाद नगरमध्ये उमटले.

भाजप कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंड यांचा पुतळा जाळला. भाजपचे लोक बिथरले. ते सर्व एकत्र होऊन दादा कळमकर यांच्या झोपडी कॅण्टीनवर चालून गेले. मोठा प्रसंग आला आणि दगडफेक सुरू झाली. मी अरुणकाकांसोबत परगावी निघालो होतो. दादाभाऊंचा फोन आला. तेव्हा आम्ही आमची गाडी झोपडी कॅण्टीनच्या दिशेने वळविली. तेव्हा मोठा जनसमुदाय दगडफेक करीत असल्याचे दिसून आले. भाजपचे वरिष्ठ नेते तेथे उपस्थित होते. काका तेथे गेल्यानंतर त्यांनी दोन्ही जमावांना शांततेचे आवाहन केले व जमाव शांत झाला आणि पुढील अनर्थ टळला.

अरुणकाकांना कुस्ती क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी येथे हिंदकेसरी स्पर्धा घेतली. त्याचे उत्कृष्ट नियोजन केले. त्यांनी नगरमधील साहित्य, नाट्य, क्रीडा या संस्थांना चांगला आधार दिला. अरुणकाकांनी संग्रामभैय्या यांना घडविण्यात आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी केली. असा सर्वसामान्यांचा आधारवड अचानक कोसळल्याने त्याचे मनस्वी दु:ख नगरकरांना झाले आहे. आमच्यावर आभाळमाया करणारा, गोरगरिबांचा आधारवड दु:खसागरात आम्हाला सोडून गेला. अशा या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

– ज्ञानदेव पांडुळे माजी नगरसेवक, अ. नगर, नगरपालिका

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...