मुंबई। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत जवळ येत चाललेली असताना सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये जरांगे पाटील यांना सरकारने निमंत्रण दिले आहे. मात्र जरांगे पाटील यांनी बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशार्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना मराठा आरक्षणावर चार मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.
बैठकांसाठी आले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, आम्ही त्यांना सांगितले आहे की, आमचीच विनंती आहे, तुम्ही तुमच्या स्तरावर बैठका घ्या. येण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. तुमचा निर्णय आम्हाला कळवा. आम्हाला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आमचे दोन शब्द मध्ये घ्या, इतकेच आमचे म्हणणे आहे. तुम्ही ते शब्द घ्या, कायदा पारीत करा, आम्ही असलो काय किंवा नसलो काय.