मुंबई। नगर सहयाद्री-
राज्य सरकार मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी विशेष अधिवेशन २० फेब्रुवारीला बोलावणार असल्याची माहिती आहे. या एक दिवसांच्या अधिवेशनात राज्य सरकार कुणबी नोंदी संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याची शयता आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबद्दल अहवाल दिल्यास नवा प्रवर्ग करुन कायदा करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शयता आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या सात महिन्यांपासून पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात दिला होता. यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्याची शिफारस करेल, अशी माहिती आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन केले होते. कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण द्यावे, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कुणबी नोंदी असतील त्यांना सगेसोयरेच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळावे या मुद्यावर जरांगे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे आंदोलन स्थगित केले होते. सरकारने जरांगे यांचे आंदोलन स्थगित करताना अधिसूचना जारी केली होती. त्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यात येण्याची शयता आहे. राज्य सरकार २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन आयोजित करुन हे निर्णय घेण्याची शयता आहे, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात बुधवारी ‘सकल मराठा’तर्फे बंद
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे या दिवशी जिल्ह्यात बंद पुकारला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.सर्व सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊनही सरकार वेळकाढूपणा करत आहे. जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल, याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. नगर जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.