श्रीगोंदा । नगर सहयाद्री
२०१३-१४ मध्ये बाळासाहेब नाहाटा हे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना चारा छावणीसाठी २ कोटी ८० लाख रुपये काढण्यात आले. मात्र हे पैसे कुठे व कशासाठी खर्च केले, दिसले नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही संचालक मंडळाने त्याच्यावर कारवाई केलेली नाही. पुन्हा १५ वर्षाचे विशेष लेखापरीक्षण करून त्यात दोषी आढळल्यास नहाटा यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिला आहे.
बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी बाजार समिती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना लोखंडे म्हणाले, गतवर्षी बाजार समितीला २ कोटी ५ लाखाचे उत्पन्न मिळाले त्यातून ८६ लाखाचा नफा मिळाला मात्र आपले कुकर्म लपवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. विरोधकांच्या कालखंडात ४० लाखाचे बांधकाम केले त्याची बिले असली तरी बांधकामात सापडत नाही.
एक विहीर खोदण्यासाठी ४ लाखाचा निधी वापरला पण विहिरीही शोधण्याचे काम सुरू आहे. विरोधकांचा लवकरच जनतेसमोर भांडाफोड करणार असल्याचा इशारा लोखंडे यांनी दिला तसेच २०१६-१७ साली तत्कालीन सभापती धनंजय भोईटे यांचे सह यांचे अधिकार विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन काढले होते मात्र सहकार नियमानुसार अशी कोणतीही तरतूद नाही तरीही त्यांचे सह्यांचे अधिकार काढून ते उपसभापतीला दिले त्या काळात अनधिकृत कामकाज झाले असून त्याची ही चौकशी करणार असल्याचे लोखंडे म्हणाले.
अतुल लोखंडे हा मोठा कार्यकर्ता आहे. आमच्या कामाची चौकशी करा किंवा उच्चस्तरीय कोणतीही चौकशी करा त्यात मी दोषी आढळतो तर माझ्यावर कारवाई होईल उलट लोखंडे यांनीच ११ महिन्यात कसलीही कामे केली नाही. फक्त सचिवांवर कारवाई करा, एवढेच केले. कर्मचार्यांचे ७ महिन्यापासून पगारही दिलेली नाहीत.
– बाळासाहेब नाहाटा ( सभापती, राज्य बाजार समिती महासंघ )