‘क्लासीकब्रीज’ अन् ‘आगमन’ या कंपन्यांच्या माध्यमातून प्रचंड लूट | नगरसह पश्चिम महाराष्ट्रात घातला धुमाकूळ
स्पेशल रिपोर्ट | शिवाजी शिर्के
तीन महिन्यांत दामदुप्पट, दाम तिप्पट व महिन्याला 10 ते 12 टक्के जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क उभे करण्याच्या लालसेत पारंगत ठरलेल्या संदीप थोरात याने त्याच्याच सह्याद्री मल्टिनीधी कंपनीत कर्मचारी राहिलेल्या सचिन साबळे याला आगमन या दुसऱ्या कंपनीत संचालक दाखवल्याचे धक्कादायक समोर आले आहे. वास्तविक सचिन साबळे याचा सहा महिन्यांपूवच एका अपघातात मृत्यू झाला आहे. साबळे मृत झाल्याचे माहिती असतानाही तो जिवंत असल्याचे दाखवत संदीप थोरात याने स्वत:चे नाव लपवत सचिन साबळे याच्या नावाने आगमन ही कंपनी सुरू केली. त्याच नावाखाली लाखो रुपयांची माया जमविली असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन साबळे हा मयत झाला असतानाही त्याच्याच नावाने डायरेक्टर म्हणून आजही व्यवहार झाले आहेत आणि आता कायदेशीर भानगड निर्माण झाली तर मयत व्यक्तीच्या विरोधात म्हणजेच सचिन साबळे याच्या विरोधात काय कारवाई होणार?
सचिन साबळे हा सह्याद्रीचा कर्मचारी! सचिन साबळे आणि विश्वास पाटोळे यांची ‘आगमन’च्या नावाने कंपनी दाखवली. त्यात हे दोघे पार्टनर दाखवले. त्यातील विश्वास पाटोळे हा संदीप थोरात याच्याकडे आजही चालक म्हणून काम करतो तर सचिन साबळे हा देखील कर्मचारीच!साबळे याची कागदपत्रे वापरत संदीप थोरात याने आगमन नावाची कंपनी नोंदवली. त्यात साबळे आणि पाटोळे हे दोघेच डायरेक्टर! यापैकी सचिन साबळे हा सहा महिन्यांपूवच मयत झाला. संचिन साबळे हा मयत झालेला असताना आजही त्या कंपनीच्या रेकॉर्डवर डायरेक्टर असल्याचे दिसते. याबाबत कोणतेही कायदेशीर सोपस्कर निर्माण झाले तर त्यात कागदोपत्री संदीप थोरात हे नाव कोठेच येणार नाही. त्यातील सचिन साबळे हा तर सहा महिन्यांपूवच मयत झालेला. मयत व्यक्तीच्या नावाने आजही सारे बँकींग होत आहे. या कंपनीच्या नावाखाली झालेले व्यवहार आणि रोकड संदीप थोरात याच्या ताब्यात आली असली तरी त्याचे त्याने अत्यंत व्यवस्थीत प्लॅनिंग केल्याचे दिसते. अत्यंत चतुराई अन् हातचलाखीने संदीप थोरात याने त्याच्या दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर क्लासीकब्रीज अन् आगमन हे दुकान चालवले. त्यातील एक मयत झाला असतानाही त्याच्या नावाचा वापर करणे संदीप जाधव याने चालूच ठेवले.
मनी लॉड्रींगसाठी थेट पश्चिम बंगाल गाठले अन् विघ्नहर होल्डींग्ज कंपनी दाखवली!
पश्चिम बंगालमधील कोलकत्याची आरओसी नोंदणी दाखवत संदीप थोरात याने कोलकत्ता शहरात विघ्नहर होल्डींग्ज प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. या कंपनीचे कोलकत्यात त्याने जागा मिळवली. दि. 17 फेब्रुवारी 1995 रोजी त्याने या कंपनीची नोंदणी केली. दोन कोटी रुपयांचे भागभांडवल कंपनीकडे असल्याचे आरओसी घेताना दाखविण्यात आले. यापैकी एक कोटी पाच लाख रुपयांचे भागभांडवल कंपनी डायरेक्टर म्हणून दाखविण्यात आलेल्या संदीप सुधाकर थोरात आणि प्रिती ग्यानस्वरुप संगवान या दोघांचे दाखविण्यात आले. या दोघांनी मिळून ही कंपनी स्थापन केल्याची नोंद आहे. पश्चिम बंगाल, कोलकत्तामध्ये 13 A, Rabindranath Road Nabagram Hooghly Hooghly WB 712246 IN असा पत्ता असल्याचे त्यात म्हटले आहे तर संपर्कासाठी दुसरा पत्ता नोंदवताना तो नगरचा देण्यात आला. त्यानुसार S.NO.101/86, SAI MIDAS TOUCH, NAGAR MANMAD ROAD SAVEDI, AHMEDNAGAR-414001 MAHARASTRA INDIA AHMEDNAGAR MH 414001 IN असा पत्ता देण्यात आला आहे. दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे. कंपनीचा ई मेल आय डी [email protected] असा देण्यात आला आहे.
शाखा असल्याचे भासवून संदीपने अनेकांना गंडवले!
नगर शहरातील ठेवीदारांना लुटणाऱ्या संबधित मल्टीसिटी निधी कंपनीच्या ज्या 29 निधी कंपन्या दाखविण्यात आल्या (संदीप थोरात त्याला शाखा म्हणायचा) त्यातील 16 कंपनी मध्ये संदीप थोरात स्वत: संचालक आहे. प्रत्येक निधी कंपनीचा नोंदणी क्रमांक वेगळा आहे. निधी कंपनी स्थापन करताना त्याचे स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असते. मात्र, संदीप थोरात सर्व 29 निधी कंपनीची रोकड रक्कम गोळा करून स्वतःकडे मागवून घ्यायचा. त्यासाठी त्याने एक चारचाकी गाडी ठेवली होती. थोरातकडे येणारी कॅश कोठे जात होती ते फक्त आणि फक्त त्यालाच माहिती होते. थोरात हा सर्व 29 निधी कंपनीचा ई मेल आय डी एकच ठेवत होता. संदीप थोरात याने वाळकी गावातील एस टी महामंडळाच्या बँकेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या मामा भालसिंग याला मुख्य कार्यकारी अधिकारी नेमले होते. त्याच्या माध्यमातून थोरात याने अनेकांना गंडा घातला.
पोलिसात गेलात तर पैसे बुडणार, अशी धमकी द्यायचा!
क्लासीकब्रीजमधून जमा केलेले पैसे त्याने सह्याद्रीमधील गुंतवणूकदारांना थोडे थोडे करत दिले. जे देतोय ते घ्या, असे म्हणत त्याने गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचे काम केले. जर माझ्या विरोधात पोलिसात गेला तर तुमचे आहे ते पैसे बुडतील अशी धमकीही त्याने दिली. त्यापेक्षा मी जे देतोय ते घ्या असे म्हणत त्याने गुंतवणूक केलेल्या रकमेतील दहा – पाच टक्के रक्कम दोन- तीन महिन्यातून एकदा काहींना दिली. मात्र, ही टक्केवारी फक्त दोन टक्के आहे.
चहावाल्या दिपक कराळे याच्यावर आपबीती!
पुण्यात चहाचे दुकान असणाऱ्या दिपक कराळेला हा पूर्वी याच संदीप थोरात याच्याकडे कर्मचारी होता. त्याची कादगपत्रे वापरत त्याला क्लासीकब्रीज या कंपनीत संचालक केल्याचे दाखवले. ‘नगर सह्याद्री’ने संदीप थोरात याच्या भानगडी बाहेर काढण्याच्या आदल्या दिवसापर्यंत संदीप थोरात आणि दिपक कराळे हे दोघेही या कंपनीचे संचालक म्हणून कागदोपत्री दिसून येत होते. कंपनी पोर्टलवरही त्यांची नावे दिसत होती. मात्र, संदीप थोरात याने त्याचे संचालक म्हणून त्या कंपनीवरील नाव शनिवारी सायंकाळी हटवल्याचे समोर आल आहे. आता दिपक कराळे हा एकटाच संचालक असल्याचे त्या कंपनीच्या पोर्टलवर दिसते. संदीप थोरात यात जर दोषी नव्हता तर त्याने त्याचे नाव का हटवले असा प्रश्न यातून समोर येत आहे.
किराणा दुकानच्या चोपडीत संदीप नोंदवायचा ठेव रकमा!
संदीप थोरात याचा वेगळाच फंडा आहे. निधी कंपनी मधील कर्मचाऱ्यालाच ठेवी गोळा करायला तो लावत असे. निधी कंपनी मधील सर्व व्यवहाराच्या नोंदी संगणीकृत ठेवणे आवश्यक होते. मात्र त्याचा हिशोब किराणा दुकाना सारखा एका वहीत होता. संदीप थोरात हा बाहेर फायनान्सचा फलक लावायचा व आत त्याचे निधी कंपनीचे कामकाज चालयाचे. प्रत्येक निधी कंपनीचे अस्तित्व वेगळे असताना त्याला तो शाखा म्हणायचा. अतिशय धूर्त व चाणाक्षपणे लुटण्याचे काम संदीप थोरात याने नगर शहर तसेच जिल्ह्यात केले आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये कुठलाही अनुभव नसलेला संदीप याने नगर शहर तसेच जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रात उच्छाद मांडला आणि विश्वासार्हता संपवून टाकली.
गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांचे अमिष तर कमीशनच्या फंड्याला कर्मचारी पडले बळी!
संदीप थोरात हा त्याच्या निधी कंपनी मधील कर्मचाऱ्यांना ठेवी जमा करायला लावायचा. वास्तविक त्यांना याचा कोणताही परवाना नव्हता. कर्मचाऱ्यांना या बदल्यात एक लाख ठेवीस पाच हजार रुपये कमिशन दयायचा तसेच या साठी त्याने कमिशन वर काही दलाल ही त्याने नेमले होते. स्वयंघोषीत उद्योग समूहच त्याने दाखवला होता. वास्तविक त्या नावाखाली ठेवीदार व गुंतवणूक दाराना लुटण्याचे उद्योग त्याने केले. एखादा ठेवीदार याच्याकडे आल्यानंतर, ‘तुम्हाला माझ्या कंपनी मध्ये 12 ते 18 व्याज मिळेल पण माझ्याकडे खाजगी ठेवल्यास तुम्हाला 60 टक्के व्याज मिळेल. मी ते पैसे शेअर मार्केट मध्ये लावतो मला तिथे जास्त परतावा मिळतो. तसेच मी सिक्युरिटीसाठी मी तुम्हाला माझ्या उद्योग समूहचा चेक देतो असे तो सांगायचा. यावर विश्वास ठेवत अनेकांनी त्याच्याकडे रकमा दिल्या. आज त्या साऱ्यांना पश्चाताप आल्याचे समोर आले आहे.
पावत्या हस्तलिखीत देण्याचा फंडा!
सह्याद्रीमधील सर्व शाखांमध्ये जमा होणारी कॅश एका चार चाकी वाहनाद्वारे स्वतः संदीप थोरात हाच घेऊन जायचा! शाखेत जमा होणाऱ्या ठेवीचे कुठल्याही संगणीकृत नोंदी न होता रजिस्टर व साध्या हाताने लिहलेल्या ठेव पावत्या दिल्या जात असत.
शब्दांचा अपभ्रंश करून लुटण्याचे काम झाले!
फायनान्स कंपनी असल्याचे भासवत संदीप थोरात याने मोठी नामी शक्कल चालवली. थोरात आणि टोळीने निधी/ मल्टीसिटी/ मल्टीपर्पज/ मल्टीस्टेट/ फायनान्स या शब्दांचा अप्रभंश करून लुटण्याचे काम केले आहे. वास्तविक पाहता शब्दांचा अपभ्रंश करत वरीलपैकी कोणत्याही नावाने कंपनी नोंदणी केली गेली. यातील एकालाही रकमा स्वीकारण्याचे, त्यांना व्याज देण्याचे अथवा बँकींग- पतसंस्था यासारखे व्यवहार करण्याचे अधिकार नव्हते आणि नाही. मात्र, संदीप थोरात याने अत्यंत बेमालूमपणे हा सारा खेळ खेळला आणि त्यात अनेकजणां आपली पुंजी गमवावी लागली. संदीप थोरात याच्या कोणत्याही कार्यालयात शासनाची मान्यता असणारा परवाना कधीच दिसून आला नाही.
अर्थतज्ज्ञाला लाजवणारी संदीप थोरातची ती फेसबुक पोस्ट आली चर्चेत!
अनेकांना ठगविणाऱ्या संदीप थोरात याची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. दि. 25 मे 2024 रोजी त्याने त्याच्या फेसबुक पेजवर ‘आर्थिक संस्था बंद पडल्यावर चेअरमनने पळून जाणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा- संदीप थोरात’ या मथळ्याखाली ही पोस्ट टाकली आहे. आर्थिक संस्था चालकांनी, संचालकांनी काय भान जपावे आणि काय करावे असे उपदेशाचे डोस त्याने या पोस्टच्या माध्यमातून पाजले. त्याची ही पोस्ट जशीच्या तशी! ही पोस्ट वाचल्यावर संदीप थोरात हा मोठा अर्थतज्ज्ञ असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात हा अत्यंत मोठा फ्रॉडर निघाला. त्याच्या 24 शाखा असल्याच्या दावा करताना या सर्व शाखा आता बंद दिसत असल्या तरी त्या दि. 1 जुलै 2024 पासून पुन्हा सुरू होतील असेही त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. वास्तविक सह्याद्रीच्या या शाखा नव्हत्याच! त्या वेगवेगळ्या नावाने त्या गावात सुरू केलेल्या कंपन्या होत्या. मात्र, संदीपने हे लपून ठेवले आणि शाखा असल्याचे समोर आणले. तो या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, ‘आणि जर माझा संयम तुटला असता,मी जर संकटासोबत लढलो नसतो,पळून जाण्याचा विचार केला असता,तर ठेवीदारांचे पैसे बुडाले असते,संचालक मंडळ अटक असत आणि मी देखील…..’. ठेवीदारांना गंडविणाऱ्या पतसंस्था चालकांबद्दल बोलताना सर्वात शेवटी तो या अशा पतसंस्था चालकांना ‘नालायक साले’ असे म्हणून मोकळा झाला.