अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. फरीद सुलेमान खान (वय ३०, रा. आलमगीर, भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
सोमवार (दि. 06) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास इम्पेरियल चौकातील उड्डाणपुलावरून एका अज्ञाताने रिक्षा स्टॉपजवळ दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकल्या. या पिशव्यांमध्ये अंड्यांसोबत कागदाचे तुकडे आढळून आले, ज्यावर महापुरुषांचा अवमान करणारा आणि समाजात तणाव निर्माण करणारा मजकूर लिहिलेला होता. हा प्रकार लक्षात येताच शहरात खळबळ उडाली होती. शहरात जाती जातीमध्ये भांडणे लावून दंगल घडविण्याचा हा प्रकार असून याप्रकरणी तातडीने सखोल चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली. पथकाने गोपनीय माहिती आणि कौशल्याचा वापर करत आरोपीचा शोध घेतला असता, तो विविध ठिकाणी वेषांतर करून वावरत असल्याचे आढळून आले. अखेर आरोपी फरीद खान याला अटक करण्यात यश आले. त्याच्याकडून सखोल चौकशी करण्यात आली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अटक केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनि दीपक मेढे, राजेंद्र वाघ, पोहेकॉ शाहिद शेख, सुनील पवार, अतुल लोटके, दीपक घाटकर, सुयोज सुपेकर, फुरकान शेख, पोकॉ सागर ससाणे, अमृत आढाव, योगेश कर्डील, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव यांनी केली आहे.