राहता । नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओदिशा आणि राज्यातून गांजा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी नितीन उर्फ आण्णा जाधव (रा.निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी ता.राहाता (फरार) साईनाथ उर्फ शिरीष गायकवाड, स्वीफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६ वरील चालक) नाव माहित नाही (फरार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्याची आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाला इको कार क्रमांक (एमएच-१५-ईक्यु-९२२२) व स्विफ्ट कार क्रमांक (एमएच-१७-सीएक्स-४४६६) या वाहनातील इसम ओडीसा राज्यातुन गांजा विक्रीसाठी राहता ते शिर्डी रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने राहता ते शिर्डी रोडवरील साकुरी शिवारातील सापळा रचला. दरम्यान दोन्ही वाहनांना थांबविण्याचा इशारा केला असता इको कारवरील चालकाने वाहन थांबविली. मात्र स्वीफ्ट कार चालकाने धूम ठोकली. पोलिसांनी अरूण मोतीलाल विश्वकर्मा (वय 45, रा. नाशिक ) यास ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी करत १३ किलो गांजा जप्त केला आहे.