मुंबई / नगर सह्याद्री : सध्या लोकसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या कुणाच्या वाट्याला किती जागर येणार? महायुतीत व महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार याविषयी विविध चर्चा सुरु आहेत. सध्या महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर दुसरीकडे आता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक 32 जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु, लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो असे म्हटले जात आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गटास १८ जागा
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांमध्ये ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडून १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट लोकसभेच्या या १८ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जाते.