अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात अन यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण देशाचे लक्ष होते.
यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली.
अहिल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक देखील लक्षवेधीच होती. कारण म्हणजे या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचे आव्हान होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होती. खरंतर, शिर्डीचा मतदार संघ हा विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणे सोपी बाब नव्हती.
पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठिंब्यातून या ठिकाणी घोगरे ताईंना तिकीट मिळाले. घोगरे यांनी या ठिकाणी विजयासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा केलेत. मात्र आज शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून या ठिकाणी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत.