मुंबई / नगर सह्याद्री : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आता लवकरच सुटेल असे चित्र आहे. बहुजन वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार व्हावी यासाठी त्यांना ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु डॉ. आंबेडकरांनी सहा जागांचा आग्रह लावून धरला. उद्यापर्यंतचा अल्टिमेटम देत त्यांनी आपल्या जागेंसाठी आग्रह कायम ठेवला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून बैठकांचं सत्र सुरु होतं. पण जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा काही जागांवर दावा होता. त्यामुळे चर्चेतून तिढा सोडवला जात होता. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत आधी प्रयत्न करण्यात आले. याबाबत बऱ्याच घडामोडी घडल्या.
त्यानंतर वंचितला मविआत सहभागी करुन घेण्यात आलं. पण जागावाटपाबाबत तिढा सुटत नव्हता. महाविकास आघाडीकडून वंचितला कालपर्यंत 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण वंचितमुळे लोकसभा निवडणुकीत संभाव्य धोका लक्षात ठेवता महाविकास आघाडीने बॅकफूटवर येण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.