Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होणार असून, काही भागांत अवकाळी पावसाचा तर काही भागांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यासंदर्भात विशेष इशारा जारी केला आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल जाणवला असून, याच पार्श्वभूमीवर येत्या ४८ तासांत आणखी एक मोठा हवामान बदल होणार आहे. सध्या हिटवेव आणि अवकाळी पावसाचं दुहेरी संकट महाराष्ट्रावर ओढावले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या भागात सायकोलॉनिक सर्कुलेशन तयार झालं असून, राजस्थानच्या सीमाभागात निम्न दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बांग्लादेशपर्यंत पसरलेली कमी दाबाची रेषा, उत्तर मध्य प्रदेशपासून गल्फ ऑफ मन्नारपर्यंत ताणलेली ट्रफलाइन आणि आसाम-त्रिपुरामध्ये ३.१ किमी उंचीवर असलेली उत्तर-दक्षिण ट्रफ हे घटक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातही या घटकांचा परिणाम दिसून येणार आहे.
हवामान विभागाने लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, अकोला, नागपूर, अमरावती, बीड, जालना, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे. या भागांत नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा परिसर मात्र कोरड्या हवामानाखाली राहील. मुंबईत सध्या कोणताही पावसाचा किंवा हिटवेवचा धोका नाही. गुजरातमध्येही सुरुवातीला तापमान स्थिर राहील, मात्र नंतर ते २–३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट वातावरण राहील, तर गुजरातमध्ये धुळीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व भारतात मेघगर्जनेसह विजांचा जोर आता कमी होईल, मात्र तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात २ ते ३ अंशांनी तापमानात वाढ होईल. पूर्व भारतात ही वाढ ४ ते ६ अंशांपर्यंत होऊ शकते. २१ एप्रिलनंतर पश्चिम विक्षोभाचा प्रभाव कमी होईल आणि जम्मू-काश्मीर, लडाख वगळता इतर भागांत पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे. परंतु २२ एप्रिलपासून दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे.