मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला. महायुतीला २३० तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
गुरूवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत राज्यातील मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाच्या पदांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार एकनाथ शिंदेंनी गृह आणि नगरविकाससह इतर महत्वांच्या खात्यांवर दावा केला आहे. मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाणार आहे. तर अजितदादांच्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थ खात दिलं जाणार आहे.
शपथविधीचा मुहूर्त ठरला?
6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून संविधान समोर ठेवून हा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला असला तर इतर महत्वाच्या खात्यावरून महायुतीत रस्सीखेच सुरूच असल्याच दिसत आहे.
भाजप-शिवसेनेत गृहमंत्री पदावरून रस्सीखेच?
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत गृहमंत्री पद कोणाला मिळणार? यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. या दोन्ही पक्षाकडून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात आली आहे. भाजपला मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्री मिळावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेकडून सुद्धा गृहमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.