मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांची जणू मालिकाच सुरू झाल्याचे चित्र आहे. महायुतीमधील अनेक मोठ्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यामुळे महायुतीची अडचण वाढली असल्याचे चित्र आहे. नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि नाही पडला तरी शिव्याच देतात. शिव्या ऐकणे हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासनं देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचंय. असे वादग्रस्त वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. मोठा वाद त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उफाळून आला होता. अखेर पाटील यांनी वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. या वक्तव्यामुळे आधीच वातावरण तापले असताना शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देतात. शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं.