सुपे / नगर सह्याद्री : उसाच्या फडात सापडली बिबट्याची तीन बछडे..शेतकर्यांत दहशत..बछड्यांची मादीशी मिलाफ करण्यासाठी वनविभागाचा अथक प्रयत्न..अखेर पिलांची आईशी भेट झाली व पिले आईला बिलगली.. पण हा भावुक करणारा क्षण शेतकर्यांना धडकी भरवणारा ठरतोय.. कारण बछडे बिबट्यांची भेट झाली पण वनविभागाने बिबट्यास जेरबंद केलेच नाही.
पारनेर तालुयातील रुईछत्रपती येथील उसाच्या शेतात तीन बिबटे आढळले होते. वनविभागाच्या २४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही पिल्ले आईच्या कुशीत विसावली. परंतु नर मादीला मोकळे सोडून वनविभागाने कोणती बहादुरी मिळवली, त्यांना पकडण्यासाठी काय उपाययोजना केल्या असा सवाल शेतकरी संजय दिवटे यांनी केला आहे.
परिसरात दिवसा, रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या वतीने पिल्लांना आईची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र बिबट्यांना पकडण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. या बिबट्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संजय दिवटे व ग्रामस्थांनी दिला आहे.
पारनेर तालुयातल्या रूईछत्रपती परिसरातील उसाच्या शेतात मंगळवार दि.३० जानेवारी रोजी बिबट्याची तीन पिल्ले सापडली होती. शेतमालक दिनकर दिवटे यांनी वनरक्षक उमाताई केंद्रे यांना तसे कळवले. बछडे व बिबट्या मादी यांची भेट होण्यासाठी वनविभागाने अथक प्रयत्न केले. त्यानंतर मध्यरात्री आपल्या पिल्लांना घेऊन गेली व वनविभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या कारवाईमध्ये वनपरिमंडळ अधिकारी प्रविण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक उमा केंद्रे, वनमजूर काशीनाथ पठारे, बाळू पाचारणे आदींनी कामगिरी केली. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरबरा काढणीचे कामे सुरू आहेत, परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जसे वनविभागाने बिबट्याचे पिल्लं मादीला मिळवून दिले तसे ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना पकडावे अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
पिंपरी जलसेनमध्येही बिबट्याची दहशत, वनविभाग मात्र ढीम्म
पिंपरी जलसेन : पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे मागील आठ दिवसांपासून मानवी वस्तीसह शेतांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. पाळीव प्राण्यांसोबतच माणसांवरही बिबट्या हल्ला करत असल्याने पिंपरी जलसेन व परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. एवढं सगळं होत असताना देखील वन विभागाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून वनविभागाबाबत संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी जलसेन व परिसरामध्ये यापूर्वी देखील अनेकदा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये २६ जानेवारीच्या रात्री पहाटे चार वाजता पत्रकार चंद्रकांत कदम यांच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला बिबट्याने उचलून नेले. त्याचबरोबर शनिवारी (दि.३) रात्री पावणे अकराच्या सुमारास पुन्हा चंद्रकांत कदम यांच्या कोंबड्यांच्या जाळी मधील दोन कोंबड्या वाघाने फस्त केल्या.
यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या गाईंवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. घरातील व्यक्तींच्या सतर्कतेमुळे बिबट्या तिथून पसार झाला. सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या आहेत. याखेरीज पिंपरी जलसेन व परिसरामध्ये पाळीव कुत्रे कोंबड्या व जनावरे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून ते फस्त केले आहे. याबाबत वन विभागाला माहिती दिली असता कर्मचाऱ्यांनी फक्त भेट दिली.
बिबट्याच्या याच परिसरामध्ये मुक्त संचार असल्याने या ठिकाणी पिंजरा लावून त्याला तातडीने जेरबंद करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत असताना देखील वन विभागाकडून अद्याप कुठलेही उपाययोजना केली जात नाही. पिंजरे शिल्लक नसल्याचे कारणे देत वन विभागाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. पाळीव प्राण्यांचा जीव गेल्यानंतर आता माणसांच्या जीवावर बेतल्यानंतरच वन विभाग जागे होणार का? असा सवाल देखील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.