निघोज | नगर सह्याद्री
राज्यात प्रसिद्ध असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. गुरुवार २ मे रोजी सकाळी सात वाजता निघोज ग्रामस्थ व लाखो भाविक मळगंगा देवीचे दर्शन घेऊन व पालखी घेऊन सकाळी सात वाजता देवीच्या हेमाडपंती बारवेकडे गेले. त्याठिकाणी मानकरी तसेच देवीचे पुजारी गायखे बंधू यांच्या हस्ते देवीच्या श्रींची घागरीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणार्या लाखो भविकानी मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषणा देत आसमंत दणाणून टाकला.
निघोज येथील मळगंगा देवीची घागर मिरवणूक हा राज्यात एक अद्वितीय सोहळा गणला जातो. घागर माध्यमातून देवीचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी साडेसात वाजता देवीच्या श्रीं ची घागर मिरवणूक बारवेपासून सुरू झाली. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शेकडो महिला कळशा घेऊन या घागर मिरवणुकीत देवीची भक्तिगीते म्हणत देवीचा जयजयकार करीत होती. ही मिरवणूक मळगंगा मंदिरापर्यंत आल्यानंतर मंदिराबाहेर पुजारी रूपालीताई गायखे यांच्या हस्ते घागरीचे औक्षण करून पूजा करण्यात आली.
यावेळी लाखो भाविकांनी देवीचा जयजयकार व टाळ्यांचा कडकडाट करीत माता मळगंगा देवीचा साक्षात्काररूपी घागरीचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर हीच मिरवणूक मुख्य पेठेतून ग्रामपंचायत चौक मार्गे पुन्हा देवीच्या बारवेजवळ आली. मिरवणूक सुरू असताना मुख्य पेठेतील प्रत्येक घरावर देवी दर्शनासाठी हजारो भाविक उभे होते. भाविक श्रद्धेने देवी घागरीचे दर्शन घेत फुलांचा व रेवड्यांचा मिरवणुकीवर वर्षाव करीत देवीचा जयजयकार करीत श्रद्धा व्यक्त करतात. हीच रेवडी भाविक गोळा करून देवीचा प्रसाद समजून ग्रहण करतात.
सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या घागर मिरवणुकीची सांगता पुन्हा देवीच्या हेमाडपंती बारवेत करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी गायखे यांनी बारवेत विधिवत पूजा करून घागरीचे पाण्यात विसर्जन केले. तब्बल अडीच तासांच्या या मिरवणुकीत लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातून आलेल्या भाविकांनी देवीला दंडवत घालून मिरवणुकीने शेरणी प्रसादाचे वाटप केले. त्यानंतर भाविकांनी गाव व परिसरात सवाष्णी कार्यक्रम करीत माता मळगंगा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. दुपारी चार वाजता देवीच्या ८५ फूट उंचीची काठी तसेच पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड या ठिकाणी असलेल्या मळगंगा मंदिराच्या शिखराला लागल्यानंतर या ठिकाणी कुंडाची यात्रा सुरू झाली. ही यात्रा शेतीचे औजारे व साहित्य तसेच खेळणी व मिठाईसाठी अतिशय प्रसिद्ध आहे.
गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात लाखोंची उलाढाल या ठिकाणी होत असते. शुक्रवार ३ मे रोजी दुपारी चार वाजता नामवंत पैलवानांचा कुस्त्यांचा हगामा याठिकाणी होणार असून निघोज ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षिसे नामंकीत पैलवानांना देण्यात येणार आहेत. या कुस्ती हगाम्याने कुंड यात्रेची सांगता होत असते. बुधवार १ रोजी सुरू झालेली यात्रा शुक्रवार ३ मेपर्यंत चालू राहणार आहे. तीन दिवसांत चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
हेडकॉन्स्टेबल गणेश डहाळे व त्यांच्या सहकार्यांनी तसेच होमगार्ड यांनी दक्षता घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. पाटबंधारे विभागाने कुकडी नदीला तसेच निघोज येथील कपिलेश्वर बंधार्याला वेळेवर पाणी सोडून लाखो भाविकांची पाण्याची व्यवस्था केली. वीज वितरण कंपनीच अभियंता हातोळकर यांनी व सहकार्यांनी विद्युत पुरवठा खंडित न केल्याबद्दल भाविक व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केलेे. आरोग्य विभागाने २४ तास आरोग्य सेवा दिली. एसटीनेही आळेफाटा, पारनेर, शिरूर येथून तसेच निघोज ते कुंड स्पेशल यात्रा बस सोडून भाविकांची सोय केली.