राहुरी । नगर सहयाद्री/;-
राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे कर्डिले यांचा विजय झाला. याच विजयाच्या जल्लोषातून राहुरीतील गुंजाळे गावात धुमश्चक्री झाली. या हाणामाऱ्यांमध्ये गोळीबार झाला. तसेच एकमेकांविरोधात कुऱ्हाडी चालवण्यात आल्या. राहुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
राहुरीतील गुंजाळे गावात भाजपचे कर्डिले समर्थकांकडून तुफान जल्लोष सुरू होता. फटाके फोडले जात होते. यातून राहुरी गुंजाळे गावातील बसस्थानक चौकात कर्डिले-तनपुरे समर्थक असलेले संजय नवले आणि बाबा चेडवाल एकमेकांविरोधात भिडले. यात एका कार्यकर्त्याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याने भाऊसाहेब नवले यांच्या पायाला गोळी लागली. नवले आणि चेडवाल यांनी हाणामाऱ्यांमध्ये एकमेकांविरोधात कुऱ्हाडीचा वापर केला.
या धुमश्चक्रीत चौघे गंभीर झाले आहेत. राहुरी पोलिसांकडे परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. संजय शिवाजी नवले, त्याचा भाऊ भाऊसाहेब नवले, बाबा चेडवाल आणि सोन्याबापू चेडवाल जखमी झाले आहे. भाऊसाहेब नवले याच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच कुऱ्हाडीने मार लागल्याने काही जण जखमी झाले आहे. या जखमींवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.