Manoj Jarange Patil News:एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? असा खडा सवाल उपस्थित करीत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे लातुर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासमोर जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, त्यातून कोणी राहिलेच तर त्यांनाही आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना अर्थात मागेल त्यास प्रमाणपत्र द्यावे. सरकारने तसे आश्वासन दिले आहे. इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी धनंजय मुंडेंना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले की, तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील, तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहीन. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा, मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील, मराठ्यांच्या बाजूने उभे राहा आणि तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हला सत्तेपासून दूर करतील. धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केलं आहे, बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली नाही.. त्यांचं कौतुकच पण मराठ्यांच्या गोरगरीबांना बीडमध्ये त्रास देऊ नका. असेच काम करा. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका, मराठ्यांच्या लोकांना मारू नका, आमच्या लोकांना शिवीगाळ करू नका, असेही जरांगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
बीडची रॅली शांततेत होणारच
बीडच्या पालकमंत्र्यांनी बीडला रॅली होणार नाही, असा घाट घातला. सभेला परवानगी मिळू दिली नाही. हा जातीयवाद नाही का? २० वर्षापासून भुजबळ यांनी जातीयवाद वाढविला. आज मराठे एकत्र आले, तर जातीयवाद कसा काय वाटतो. गावागावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मराठा आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी नेते कधीही सकारात्मक होणार नाहीत,ओबीसी नेते विरोधात आहेत, त्यात दुमत नाही. आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे, १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयर्याची अंमलबजावणी करेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.