भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई
अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरातील भिंगार कॅम्प परिसरात असणाऱ्या दमडी मशिदजवळ गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलीसांनी जेरबंद केले आहे. जाबीर सादिक सय्यद ( वय-३४ वर्षे, रा. गोविंदपुरा, अहमदनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दि.२५ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावुन दमडी मशिदजवळ जावुन पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसुन आला. सदर इसमाकडून एक गावठी बनावटीचा कटटा व दोन जिवंत काडतुस जप्त केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, कैलास सोनार, संदिप घोडके, दिपक शिंदे याच्या पथकाने केली आहे.