नवी दिल्ली / नगर सह्याद्री : नितीन गडकरी यांना सातत्याने पंतप्रधान पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार असल्याची चर्चा वारंवार केली जाते. त्यांच्यात आणि मोदी यांच्यात बेबनाव असल्याच्या देखील भ्रामक कल्पना प्रसारित केल्या जातात. आता यावर स्वतः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात वाद आहे, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. ‘मला दुःख होते, जेव्हा लोक माझे आणि पंतप्रधान यांच्यात भांडण होतील, असे वक्तव्य मीडियात करतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे.
आम्ही पक्ष कार्यालयात ठळक अक्षरात लिहिले आहे, राष्ट्र सर्वप्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी. आमच्यात कोणात विवाद उरलाच नाही ‘ अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश चहुबाजूंनी प्रगती करत आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. मला तशी आकांक्षा नाही. यावरुन माझा कोणाशी वाद नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हे केवळ रिकामटेकड्या लोकांचे विश्वलेषण असल्याचा टोला त्यांनी हाणला.