अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पुढील दोन ते तीन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक यंत्रणा आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. येत्या २७ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शयता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार गुरूवार (दि.१) पासून जिल्हा निवडणूक विभागाने नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आवश्यक असणार्या मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सुरू केली आहे. येत्या ४० दिवसांत ही तपासणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान, अहमदनगर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे खा. नीलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव केलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर केेंद्रीय निवडणूक आयोगाने विहीत पध्दतीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार डॉ. विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रातील मतमोजणीची पडताळणी व्हावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुल्कास अर्ज केलेला आहे.
तसेच याप्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघात वापरलेली मतदान यंत्रे वगळून शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिकवरून मतदान यंत्रणाची मागणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकवरून ४ हजार ४३५ मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.