हिंगोली / नगरसह्याद्री : शिंदे गट शिवसेनेतून फुटून सत्तेत भाजपसोबत आला. परंतु सध्या शिंदे गटात असणारा बेबनाव समोर येत आहे. खासदार हेमंत पाटील व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा वाद अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत ठेपल्याचे समोर आले आहे.
आज (६ जानेवारी) सुरु असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. आजची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीलाच पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निधी वाटपातील भेदभावावरून संताप व्यक्त केला. तर राज्यात एवढे जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून अशा पद्धतीने शेण खाणे योग्य नसल्याचे म्हटले. यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले. त्यानंतर या दोघांत चांगलीच खडाजंगी झाली. पाटील यांनीही अशीच पद्धत चालू राहणार असेल तर तुम्ही किंवा तुमची माणसे जिल्ह्यात आले तर त्यांना शिवसैनिक पायाखाली तुडवतील, असा गंभीर इशारा सर्वांच्या साक्षीनेच दिला.
हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा फोडणी बसली आहे. आधी आ.बांगर यांची नाराजी, आता खा. पाटील यांची नाराजी होत असल्याचे दिसत आहे.