मुंबई / नगरसह्याद्री : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर सहा ठिकाणी छापेमारी केली. कथित शिखर बँक गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी केली.
रोहित पवारांच्या बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकले गेले. या छापेमारीवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. आज पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडत राजकीय घणाघात केला आहे. घरभेदी लोकांमुळे रोहित पवार यांच्या कारखान्यांवर ईडीने छापेमारी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “या विषयावर मला फार भाष्य करायचं नाही.
मात्र मागील सात दिवसांत भाजपचे आणि अजितदादा मित्र मंडळाचे कोणकोणते नेते दिल्लीला गेले होते, याचा तपशील काढल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कळतील. आज सत्तेतील नेते फार मोठमोठ्या आवाजात बोलत आहेत.
पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, मी खरंच चूक केली असती तर काल परदेशात असतानाही कारवाईनंतर इथं आलो नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजितदादांसोबतच भाजपबरोबर गेलो असतो. परंतु मी असं काहीही केलेलं नाही. कारण आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे,” असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला.