अकोले / नगर सहयाद्री : दारूबंदी करण्यासाठी अनेक गावात विविध उपाययोजना होत असतात. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांसह कोणीही पाहुणा गावात दारू पिऊन आल्याचे आढळून आल्यास त्याची गावकऱ्यांकडून यथेच्छ धुलाई करण्यात येईल, तसा ऐतिहासिक ठराव सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला आहे.
सोमवारी गावकऱ्यांसह युक्क – गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचे आवाहन केले. यानंतर दारू विकताना आढळून आल्यास गावकऱ्यांकडून मारहाण करून दुकान फोडून टाकू, असा इशारा दिला. दरम्यान, दुपारनंतर इंदोरी गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून याची लेखी हमी व सह्या घेऊन इशारा दिला.
इंदोरी ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव मंजूर करून दारूच्या बाटल्या फोडल्या. या कारवाईत बेकायदेशीर दारू विक्रेता स्वतःच सहभागी झाला व त्याने दुकानातून दारूच्या बाटल्या काढून देत फोडू लागला. गावातील चारही बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून गावकऱ्यांनी तसे स्वाक्षरीसह लिहून घेतले. गावकऱ्यांसह युक्कांनी कोणी दारू पिऊन आढळून आल्यास हात साफ करून पोलिस ठाण्यात पाठवण्याचा इशारा दिला.