पारनेर / नगर सहयाद्री : मागील सात महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात नवनवीन पळवाटा व अध्यादेश काढत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे गुन्हे मागे घेतो असे सांगत मराठा बांधवांवर दररोज नवनवीन गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे किती गुन्हे अथवा राजकीय षडयंत्र किंवा बदनामी करा आरक्षणासाठी मी हातावर मरण घेतले असून मराठ्यांच्या नादाला लागला तर राजकीय सुपडा साफ करत असतो असा खणखणीत इशारा मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी (२३ मार्च) दुपारी दीड वाजता पारनेर शहरातील मुख्य चौकात मनोज जरांगे पाटील आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी १२ जेसीबीद्वारे जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी त्यांनी चौकातील मुस्लिम बांधवांच्या दर्ग्यावर चादर चढवली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी संभाजी औटी, निलेश खोडदे, संजय वाघमारे, शाहू औटी, अर्जुन भालेकर, दत्तात्रय आंबुले, शिवाजी औटी, तुषार मोरे, मच्छिंद्र मते, रामा गाडेकर, योगेश रोकडे, मार्तंडराव बुचडे, नंदकुमार देशमुख, सुभाष औटी, बाळासाहेब मते, डाॅ.बाळासाहेब कावरे, सुरेंद्र शिंदे, मुद्स्सर सय्यद, राजू शेख, संतोष वाडेकर, अनिल शेटे, किरण पानमंद, सतीश म्हस्के, धीरज महांडुंळे, रायभान औटी, प्रियंका खिलारी, रेखा औटी, आशा औटी आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भाषणाला सुरुवात केली. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाज आरक्षणासाठी ३० दिवस द्या असे म्हणणाऱ्यांनी समाजाची फसवणूक केली आहे. आजवर ५७ लाख नोंदी लपवून ठेवल्या असा घणाघात करत राज्य सरकारने
आंदोलन कर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे असे अनेक वेळा बैठकीत ठरले होते. पण तसे झाले नाही. कितीही षडयंत्र व बदनामी करायची ते करा परंतु माझी नियत मी ढळू दिली नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पारनेर येथील कार्यकर्ता संवाद बैठकीत दिला.
ईडी, एसआयटीला घाबरणारापैंकी नाही : जरांगे पाटील
कुणाला ईडी लावली तर लोक त्यांच्या पक्षात येत आहेत. परंतु मी समाजाशी गद्दारी करणार नाही. माझ्यावर एसआयटी लावली. ज्याने गुन्हा केला, भ्रष्टाचार केला त्यांच्यासाठी एसआयटी आहे त्यामुळे माझा घरावर १३ पत्रे आहेत माझी संपत्ती मराठा समाज आहे असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मंत्र्यांचे संभाषण व विनंती व्हायरल करू का?
राज्य सरकार मधील अनेक मंत्री आमच्यावर बोलू नका असे खाजगीत फोनवरून व समक्ष सांगत आहेत. आम्हाला धमक्या किंवा गुन्हे यांची भिती नका दाखवू. तुम्ही मला काय विनंती करत होते ते व्हायरल करू का? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.