राणांचा पराभव करण्याचे आवाहन
अमरावती | नगर सह्याद्री
गत लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने इथल्या अपक्ष उमेदवाराला (नवनीत राणा) पाठिंबा दिला होता. त्या उमेदवारासाठी मी अमरावतीत प्रचार सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केले. परंतु मागील ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पाहता माझी चूक झाली असे मला वाटते. अमरावतीकरांनी मला माफ करावे आणि झालेली चूक दुरूस्त करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. अशी चूक माझ्याकडून होणार नाही असे सांगत नवनीत राणा यांचा पराभव करा, असे आवाहन पवार यांनी मतदारांना केले.
याआधी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंच्या पोटनिवडणुकीवेळी देखील शरद पवार यांनी सातारकरांची माफी मागितली होती. त्यावेळी सातारच्या जनतेने पवारांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊन श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. त्यानंतर आता अमरावतीकर काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची सभा संपन्न झाली. नवनीत राणा यांचा मागील ५ वर्षांच्या कार्यकाळावर मविआ नेत्यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला विविध योजनांवरून धारेवर धरले. तर शरद पवार यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच नवनीत राणांना उमेदवारी देणे ही चूक होती, अशी जाहीर कबुली दिली.
शरद पवार म्हणाले, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. गत लोकसभा निवडणुकीत इथल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे ही माझी चूक झाली. त्यांच्यासाठी मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केले. परंतु मागील ५ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पाहता मी अस्वस्थ होतो. कधीतरी इथे येऊन अमरावतीकरांची माफी मागावी असे वाटत होते. जनतेने आता चूक दुरुस्त करावी, असे आवाहन करत अशी चूक माझ्याकडून पुन्हा होणार नाही, असेही स्पष्ट केले.