पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील काळेवाडी (सावरगाव) येथील बाबाजी शिवाजी गायखे यांचा खून पत्नी सुप्रिया बाबाजी गायखे (वय 27, रा. निघोज) आणि तिचा परप्रांतीय प्रियकर जनकभाई भुपतभाई भिडभिडीया (रा. गुजरात) यांनी मिळून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
निघोज ते पाबळ रोडवर 13 एप्रिल रोजी अपघाताचा बनाव रचून हा खून लपवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पारनेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याची उकल करत दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांना निघोज-पाबळ रोडवर अज्ञात व्यक्तीच्या अपघाताची माहिती मिळाली होती. प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपासादरम्यान मृत व्यक्ती बाबाजी शिवाजी गायखे असल्याचे निष्पन्न झाले.
शवविच्छेदन अहवालात डोक्यात हत्याराने मारल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास तीव्र केला. तपासात सुप्रिया गायखे हिचे जनकभाई भिडभिडीयासोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. पती बाबाजी हे या संबंधांना अडथळा ठरत असल्याने सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने राहत्या घरात बाबाजी यांचा हत्याराने डोक्यात मारून खून केला.
त्यानंतर मृतदेह मोटरसायकलवर निघोज-पाबळ रोडवर टाकून अपघाताचा बनाव रचला. पोलिसांनी सुप्रिया आणि जनकभाई यांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग, गहिनीनाथ यादव, विवेक दळवी, गोवर्धन जेवरे, जालिंदर लोंढे यांच्या पथकाने बजावली आहे.