मुंबई / नगरसह्याद्री : वर्ष २०२३ आता संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच हे वर्ष संपून जानेवारी लागेल. परंतु या सरत्या वर्षात शेअर मार्केट मात्र रॉकेटच्या स्पीड वर चालले आहे. आज भारतीय शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी सर्व ऑलटाईम हाय रेकॉर्ड लेव्हलवर खुले झाले. बुधवार, २० डिसेंबर रोजी बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक स्थापन केले. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ७२,००० अंकांच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली.
बाजार उघडताच सेन्सेक्सने ७१,८०० अंकांचा विक्रमी उच्चांक गाठला तर निफ्टीने प्रथमच २१,५५० अंकांचा टप्पा ओलांडला. एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील जबरदस्त तेजीमुळे सेन्सेक्सने मार्केटच्या सुरुवातीला ४०० अंकांची झेप घेतली आणि ७१,८०० अंकांवर पोहोचला. निफ्टी50 ने २१,५५० अंकांचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला.
आयटी शेअर्समध्ये तेजी
बुधवारी बाजाराच्या ऐतिहासिक तेजी आयटी समभागांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आयटी कंपन्यांच्या शेअर्सनी कमालीची वाढ नोंदवली आणि आज बाजार उघडल्यानंतर आयटी निर्देशांक ३७,६५० अंकांवर पोहोचला आणि त्यात सुमारे ३३० अंकांची वाढ दिसून आली. बाजार उघडल्यानंतर पाच मिनिटांतच आयटी निर्देशांक तेजीत दिसत आहे.