नाशिक | नगर सह्याद्री
देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. लोकसभेत देशात ४०० पार अन् राज्यात ४५ प्लसचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भाजप, महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज राजकीय नेते वर्तवत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील असा दावा केेला आहे.
महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर सुरू आहे. मात्र पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपाचाच मतदार पक्षावर नाराज आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी राजकीय पातळी खाली आणली त्यामुळे सामान्य नागरिक नाराज आहे. भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
तसेच भाजपाचा मतदार बाहेर न आल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असे म्हणत भाजपला १३ ते १४, शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही तसेच एकूण महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, सत्ताधार्यांकडून २ हजार कोटी रुपये या निवडणुकीत लोकांना वाटण्यात येणार आहेत असा आम्हाला अंदाज आहे. लोकांना विचारले तर ते सांगत आहेत पैसे महायुतीच्या लोकांकडून आलेत.
बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला. पण पैशांचे वापर केला तरी काही उपयोग होणार नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी यावेळी केली.