शिर्डी । नगर सहयाद्री-
आयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे उध्दव ठाकरे यांचा केवळ आकांडतांडव सुरु आहे. हा सोहळा राजकीय नव्हे तर कोट्यावधी भारतीयांच्या मनातील आहे. निमंत्रणाची वाट कसली पाहाता? तुम्ही सोहळ्यात सहभागी न झाल्याने काही फरक पडणार नाही अशा सडेतोड शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेशनाही त्यामुळे त्याचे आकांडतांडव सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधला होता.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. उद्या निवडणूका झाल्या तरी, राज्यात महायुतीचेच सरकार येणार आणि देशातील तीन राज्यांचा निकाल पाहीला तर, देशामध्ये पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आहे. असे कितीही सर्व्हे आले तरी, देशातील जनतेच्या मनता फक्त नरेंद्र मोदीच असल्यामुळे राज्यातही लोकसभा निवडणूकीत ४५ च्या पुढे जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना ना.विखे पाटील म्हणाले की, शिर्डी येथील दौ-यात मी प्रधानमंत्र्यांना तलवार भेट दिली आहे. त्या तलवारीवर विष्णूच्या दशावताराची चित्र आहेत. जेव्हा अपप्रवृत्ती तयार होतात तेव्हा भगवान विष्णू अवतार घेतातच, विरोधकांना त्यांची भिती आहे. लोकशाही मार्गाने त्यांचे पानीपत करण्यासाठी मोदीजी दशावताराच्या भूमिकेतच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजालाही याची खात्री आहे. जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता भासणार नाही. उलट त्यांनी ज्यांच्यामुळे आरक्षण गेल त्यांच्या घरावर मोर्चे नेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील मनोज जरांगे यांना केले.