अहमदनगर / नगर सह्याद्री :
माणसाने आपल्याला जाताना जी सहा मन वजनाची लाकडे लागतात इतकी तरी झाडे लावावीत. तोंड देखले वृक्षारोपण न करता संगोपन देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आदर्श गाव हिवरे बाजार हे चहूबाजूने हिरवाईने नटलेले गाव आहे. त्यामुळे बाजार चे नाव मला हिरवे बाजार करावेसे वाटते असे गौरवोदगार हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी काढले. नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे अयोध्येतील श्री राम लल्ला मूर्ती शीलांश स्थापनेनिमित्त आयोजित श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ नानासाहेब जाधव, नगर शहर संघ चालक डॉक्टर रवींद्र सातारकर दैनिक लोकमतचे नगर निवासी संपादक सुधीर लंके, विकास अधिकारी शाम भोकरेआदी मान्यवर उपस्थित होते. समाधान महाराज शर्मा यांनी श्री राम जन्म सोहळा हे कथेचे दुसरे पुष्प गुंफले.
कथा निरुपणात ते पुढे म्हणाले की आज रामनवमी आहे राम जन्माच्या दिवशी हिवरे बाजारात शीलांश स्थापनेनिमित्त आयोजित कथे मध्ये श्री राम जन्म होतो यापेक्षा दुसरे भाग्य ते काय. ज्याला स्वतःचं ग्राम राज्य वाटतं असाच होता तो राम म्हणून त्याला रामराज्य म्हणतात. हिवरे बाजारातली हिरवाई पाहून समाधान वाटते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं राज्य ज्या वेळेला होत ना त्या वेळेलाच म्हणायचं ग्राम राज्यात रामराज्य. जे माझे आहे ते जपले पाहिजे. तुम्हाला लागणारी लागणारी कमीत कमी किती तरी झाडे लावा त्याला जगवा त्याला मोठ करा. वृक्षारोपण मजा म्हणून करायचं नाही, साहेब आले होते आणि तीन खड्डे खोदले. संगोपन फार महत्त्वाचे आहे स्वतःच्या बाळाला जसे वाढवतो तसे वृक्षाला वाढवले पाहिजे. हिवरे बाजार मध्ये ते झाले त्यामुळे येथे ग्राम राज्यात रामराज्य ही संकल्पना रुजली हे प्रशसनीय आहे.
कथेच्या दुसऱ्या दिवशी कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गाला पिवळा रंग देण्यात आला होता समस्त महिला वर्गाने पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या कथेच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी लाल रंग वेश परिधान करण्यासाठी देण्यात आला आहे. दुसऱ्या पुष्पाची सांगता महारतीने करण्यात आले. गावातल्या शंभर यजमानाने सपत्नीक महाआरतीमध्ये सहभाग घेतला त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला.