अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, या मागणीसाठी नगर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये ५० हजार आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी, सर्व प्रकारच्या कर्जातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, तसेच पिक विम्याचे कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ, महागडी खते-औषधे यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक शेतकरी सावकार आणि बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान व माजी सरकारांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आणि परिणामकारक मदत म्हणून सर्वप्रकारच्या कर्जावर सरसकट कर्जमुक्ती लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
ही कर्जमुक्ती अल्प मुदतीच्या पिक कर्जांबरोबरच मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पालीहाउस, दूध उत्पादक कर्ज तसेच सावकारी कर्ज यावरही लागू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
या शिष्टमंडळात राजेंद्र भगत (तालुका प्रमुख), प्रवीण गोरे (युवासेना), माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, गणेश कुलट, संतोष काळे, अनिल परभणे, पोपट निमसे, जीवा लगड, संदीप खामकर, संतोष मचे, अर्जुन टांगळ, विष्णू चेमटे, निसार शेख, रामेश्वर सोलट, बाबासाहेब ससे, भरत गांगुर्डे, किरण गांगुर्डे, अरुण ससे, शेख आयाज, आकाश आठरे, दीपक शिंदे यांचा समावेश होता.